मुंबई (वृत्तसंस्था) अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या भाजपला मत देऊ नका, असे आवाहन करत देशभरातील १०० हून अधिक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते भाजपाविरोधात एकवटले आहेत. ‘आर्टिस्ट युनायटेड इंडिया’ अंतर्गत हे कलाकार एकत्र आले आहेत.
‘आर्टिस्ट युनायटेड इंडिया’ यांनी एक संयुक्त पत्रक प्रसिद्ध करत जनतेला आवाहन केलं आहे. निर्माते-दिग्दर्शक आनंद पटवर्धन, दिग्दर्शक वेत्री मारन, दिग्दर्शक मिरांशा नाईक अशा तब्बल १०० हून अधिक फिल्म मेकर्सनी या पत्रकावर सह्या केल्या आहेत. २०१४ ला निवडून दिलेल्या या भाजप सरकाराने देशाला युद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन सोडले. समाजात हिंदू-मुस्लीम तेढ वाढली, मागासवर्गीयांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे या सरकारनं कायम दुर्लक्ष केलं, अशी टीकाही या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि भाजपाला रोखण्यासाठी ही लोकसभा निवडणूक अखेरची संधी आहे. त्यामुळे जनजागृती करणं महत्त्वाचं आहे असंही या कलाकारांचं मत आहे.