नवी दिल्ली वृत्तसंस्था । उत्तराखंडमध्ये चीनव्याप्त तिबेट सीमेवरील चौकीवर तैनात भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांनी एका मृत व्यक्तीचे शव खांद्यावर घेत २५ किलोमीटरवरील त्याच्या घरी पोहोचवले. या जवानांनी तब्बल ८ तासांचा दुर्गम भागातून पायी प्रवास केला.
उत्तराखंडमधील पिथोरागड जिल्ह्यातील बुगदयार चौकीजवळील सीमेवरील स्युनी या गावातील एका स्थानिक ३० वर्षीय युवकाचा हा मृतदेह होता. या युवकाचे शव येथे पडलेले असल्याची माहिती आयटीबीपीच्या १४ व्या वाहिनीला मिळाल्यानंतर त्यांनी हे मानवतेचे दर्शन घडवले.
भारत – तिबेट सीमा पोलिसांच्या माणुसकीने सारेच गहिवरले
आयटीबीपीच्या जवानांना ही माहिती ३० ऑगस्टरोजी मिळाली. त्यानंतर आयटीबीपीच्या जवानांनी मृतदेहाला सुरक्षित केले. त्या वेळी या भागात मुसळधार पाऊस कोसळत होता. रस्ताही वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला होता. स्थानिक लोकांकडून मृत व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यानंतर जवानांनी स्यूनी येथून सुमारे २५ किमीच्या अंतरावर असलेल्या मृत व्यक्तीच्या घरी स्ट्रेचरचा आधार घेत हे शव पोहोचवले.
मुसळधार पावसामुळे खराब झालेला रस्ता जवानांनी सावधगिरीने पार केला ३० ऑगस्टला दुपारी शव घेऊन निघालेले जवान संध्याकाळी सुमारे साडे सात वाजता मृत व्यक्तीच्या घरी पोहोचले. ८ जवानांनी आळीपाळीने हे शव खांद्यावर घेत पायी रस्ता कापला. बंगापनी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.