तृणमूलनंतर आपसुध्दा लाेकसभा स्वबळावर लढणार; मुख्यमंत्री मान यांची घोषणा

चंदीगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पश्चिम बंगालपाठोपाठ आता पंजाबमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाने काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. पंजाबमध्ये आप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याबाबत स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, पंजाबमधील सर्व 13 लोकसभा जागांवर आम आदमी पक्ष स्वबळावर लढवणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी देखील याला सहमती दिल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यापूर्वीही अनेकवेळा सार्वजनिक व्यासपीठावर यावर वक्तव्य केले होते.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीही पश्चिम बंगालच्या सर्व जागांवर त्यांचा पक्ष एकटाच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस ही काँग्रेससोबत लढवणार नसून सर्व जागा स्वबळावर लढलणार असल्याचं म्हटलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस सोबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं म्हटले आहे. बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू असे ही त्या म्हणाल्या. देशात काय होईल याची मला चिंता नाही पण आम्ही एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत. बंगालमध्ये भाजपचा एकहाती पराभव करू. मी इंडिया आघाडीचा भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे, पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही. इंडिया आघाडीला एकाच दिवशी दोन मोठे झटके लागले आहेत. आप आणि तृणमूल काँग्रेस पक्षाने ज्यांची राज्यात सत्ता आहे त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे आता इतर राज्यांमध्ये काय होतं याकडे ही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

इंडिया आघाडीत फूट पडल्यानंतर भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमधील सर्व जागांवर निवडणूक लढवायची आहे, म्हणूनच त्यांनी काँग्रेससोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जींच्या मनात कुठेतरी त्यांना विरोधी पक्षाचा चेहरा बनायचे आहे. पण त्यांचे नाव कोणीही सुचवले नाही. वारंवार दिल्लीला जाऊनही फायदा झाला नाही.

Protected Content