स्वारगेट प्रकरणानंतर मंत्री मिसाळ यांचा महिला सुरक्षेबाबत मोठा निर्णय !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | स्वारगेट एसटी बसस्थानकात घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या संदर्भात शनिवारी परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी एसटी महामंडळ आणि पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली. यावेळी डीसीपी अमोल झेंडे, एसीपी वाहतूक अश्विनी राख, प्रादेशिक व्यवस्थापक अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांच्यासह एसटी, पोलिस आणि आरटीओ विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, एसटी स्थानकांमध्ये सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना केल्या जाणार आहेत. सुरक्षारक्षकांची संख्या वाढवली जाणार असून, आयपीएस दर्जाचा सुरक्षा अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. याशिवाय, पोलिस गस्त वाढवली जाईल आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक सुरू करण्यात येणार आहे, तसेच खासगी बस चालकांची घुसखोरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवल्या जातील. दरम्यान, केंद्र सरकारच्या स्क्रॅप पॉलिसीनुसार राज्यातील जुन्या बसेस 15 एप्रिलपर्यंत स्क्रॅप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे बसस्थानकांची व्यवस्था सुधारली जाणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.

पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडवली आहे. अत्याचारप्रकरणी आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान, आरोपीने पीडित तरुणीशी विश्वास संपादन करून तिला बसमध्ये नेले आणि तेथे अत्याचार केला. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी एसटी स्थानकांमध्ये अधिक सतर्कता बाळगण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Protected Content