मुंबई/दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रातील मोदी सरकारने शुक्रवारी अर्थसंकल्प मांडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. मुंबई, दिल्लीसह अन्य महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. मुंबईत पेट्रोल दर लिटरमागे २.४० रुपयांनी वाढून ७८.५७ रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलच्या दरातही लिटरमागे २.५० रुपयांची वाढ होऊन ६९.९० रुपयांना मिळत आहे.
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प मांडताना पेट्रोल आणि डिझेलवर दोन रुपये प्रतिलीटरच्या दराने एक्साइज ड्युटी आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस लावण्याची घोषणा केली होती. पेट्रोल आणि डिझेलवरील सेस वाढवल्याने सरकारी तिजोरीमध्ये 28 हजार कोटींची भर पडणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. दरम्यान, पेट्रोल, डिझेलच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचे अर्थसंकल्पाद्वारे मोदी सरकारने ठरविले आहे. मात्र आगामी काळात पेट्रोलचे दर नऊ रुपये तर डिझेलचे दर चार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही वाढ टप्प्याटप्प्याने केली जाईल.
केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलवरील अबकारी शुल्क, रस्ते अधिभारात लिटरमागे प्रत्येकी एक रुपयाची वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परिणामी पेट्रोल, डिझेलच्या दरांत आजपासून वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर काल ७६.१५ रुपये प्रतिलिटर होते, आज त्यात २.४२ रुपयांची वाढ होऊन ७८.५७ रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलच्या दरात २.५० रुपयांची वाढ होऊन ते ६९.९० रुपयांवर पोहोचले आहे.