जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘पंचायत समिती व ग्रामपंचायती सक्षमीकरण मोहिमे’ला मोठे यश मिळत आहे. या मोहिमेअंतर्गत जामनेर पंचायत समितीपाठोपाठ आता एरंडोल पंचायत समितीनेही आयएसओ (ISO) मानांकन प्राप्त करून जिल्ह्यातील प्रशासनिक कार्यक्षमतेत आणखी एक मोलाचा दगड रोवला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून ही मोहिम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेचा मुख्य उद्देश ग्रामपंचायती आणि पंचायत समित्यांचे प्रशासन, सेवा सुविधा, कामकाजातील पारदर्शकता आणि एकूण गुणवत्तेला अधिक मजबूत करणे हा आहे. या उपक्रमांतर्गत विविध आंतरराष्ट्रीय निकषांवर आधारित मूल्यमापन करून आयएसओ मानांकनासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते.

जामनेर पंचायत समितीला मिळालेल्या यशानंतर एरंडोल पंचायत समितीला मिळालेले हे आयएसओ मानांकन, जिल्हा परिषदेच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीचे प्रतीक मानले जात आहे. एरंडोल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डी. ई. जाधव यांनी हे मानांकन अधिकृतपणे स्वीकारले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी एरंडोल पंचायत समितीच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत त्यांच्या अथक प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. त्या म्हणाल्या, “ही तर फक्त सुरुवात आहे. जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांनाही याच धर्तीवर सक्षम करून त्यांना आयएसओ मानांकनाच्या दिशेने मार्गदर्शन केले जाईल.” त्यांच्या या विधानातून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यपद्धती अधिक बळकट करण्याचा आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता मानकांपर्यंत नेण्याचा जिल्हा परिषदेचा दृढनिश्चय दिसून येतो. यामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामात अधिक गती आणि पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा आहे.



