लखनऊ वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशातल्या हाथरस येथील भयंकर घटनेमुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आता याच राज्यातील बलरामपूर येथे एका दलीत तरूणीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
बलरामपूरमधील गैथली पोलीस स्थानकात तरूणी गायब झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. ती तरूणी एका खासगी कंपनीत काम करत होती. परंतु बुधवारी जेव्हा ती कामावर गेली तेव्हा रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. त्यावेळी तिच्या कुटुंबीयांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी तिच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. परंतु थोड्या वेळानं ती तरूणी रिक्षातून घरी परतली. परंतु ती गंभीर स्थितीत होती, अशी माहिती तिच्या कुटुबीयांनी पोलिसांना दिली. त्या तरूणीला रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. शाहिद आणि साहिल अशी या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी अधितक तपास करून दोषींना कठोर शिक्षा करणार असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तर यावरून आता विरोधकांनी योगी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे.