जळगाव (प्रतिनिधी):मागील काही दिवसापासून वादात सापडलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांच्या बदलीचे आदेश आज प्राप्त झाले आहेत.
औषध खरेदीच्या टेंडरमध्ये घोळ, प्रतिनियुक्तीचे आदेश नसताना प्रतिनियुक्ती करणे यासह कामात अनियमिततेचा ठपका ठेवून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत करण्यात आला. अखेर आज त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले असून त्यांची नियुक्ती रत्नागिरी येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. कार्यमुक्त करण्याचा ठरावा विरोधात जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत, जि. प. सदस्य व पदाधिकारी यांनी सभागृहात आपणास बाजू मांडू दिली नसल्याचा आरोप केला. या पत्रकार परिषदेस जि. प. सदस्य जयपाल बोदडे यांनी आक्षेप घेत आरोग्य अधिकारी यांनी कोणाची परवानगी घेऊन पत्रकार परिषद घेतली असा मुद्दा उपस्थित केला होता. याविरोधत २ जुलै रोजी झालेल्या स्थायी सभेत डॉ. कमलापूरकर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. आज त्यांची बदली रत्नागिरी येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या स्थानी सोलापूर आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉ. शीतलकुमार जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.