अमळनेर प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमुळे वकिल बांधवांना आर्थिक अरिष्टाला समोरे जावे लागत असून शासनाने पॅकेज जाहीर करावे अशी मागणी येथील वकिल संघाने केली आहे.
सध्या कोरोनाच्या आपत्तीमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून याचा विविध क्षेत्रांना फटका बसला आहे. यात विधी क्षेत्रात सेवा पुरवणार्या वकिल बांधवांचाही समावेश आहे. चार महिन्यांपासून उत्पन्न नसल्याने त्यांच्या समोर मोठे संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमिवर अमळनेर येथे वकिल संघाची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करण्यात आले. या बैठकीत राज्य शासनाने आर्थिक पॅकेज द्यावे अशी मागणी करण्यात आली. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच दिल्ली सरकारने वकिलांसाठी पॅकेज दिले, त्याच प्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील वकिलांना आर्थिक साहाय्य द्यावे, अशी मागणी अमळनेर वकील संघाने केली.
या मागणीचे निवेदन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे सचिव आणि स्थानिक आमदार अनिल भाईदास पाटील यांना देण्यात आले. याप्रसंगी वकील संघाचे सचिव दिनेश पाटील, उपाध्यक्ष संभाजी पाटील व अध्यक्ष शकील काझी, अशोक बाविस्कर उपस्थित होते.