जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीतील दालमील कंपनीत ट्रक मागे घेत असतांना ४५ वर्षीय हमाल मजूराचा दबुन मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
गणेश पांडू चव्हाण (वय-४५) रा. लियानी ता. एरंडोल ह.मु. पोलीस कॉलनी असे मयत मजूराचे नाव आहे. हकीकत अशी की, गणेश चव्हाण हे एमआयडीसीतील डी-सेक्टरमधील कक्कड उद्योग दालमिल कंपनीत हमाल म्हणून एक वर्षांपासून कामाला आहे. आज ८ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे ते सकाळी ७ वाजता कामावर गेले. दरम्यान ७.४५ वाजेच्या सुमारास काम करत असतांना (जीजे ३४ टी ९४७७) क्रमांकाच ट्रकमधील माल उतरविण्यासाठी त्याला रिव्हर्स येत होता. त्यावेळी गणेश चव्हाण हे ट्रकच्या मागच्या बाजूला उभे होते. त्यावेळी ट्रकचालकाच्या लक्षात न आल्याने त्यांनी थेट धडक दिली. यात भिंत आणि ट्रकच्या मध्ये दबले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच ट्रकचालक ट्रक सोडून घटनास्थळाहून पसार झाला आहे. दालमिल कंपनीच्या मालकाने तातडीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.
अपघात होताच मयत गणेशचव्हाण यांचे नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली होती. कुटुंबियातील सदस्यांनी मृतदेह पाहून हंबरडा फोडला होता. मयताच्या पश्चात पत्नी निर्मलाबाई, गजानन, गोविंदा आणि सनि हे तीन मुले आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीसात ट्रक चालकावर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.