मुंबईतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), मुंबई येथे दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेस सुरूवात झाली आहे, अशी माहिती प्राचार्य किशोर निंबाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, आयटीआयचे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना केंद्र व राज्य शासनामध्ये शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांमध्ये रोजगार व स्वयंरोजगार तसेच परदेशात रोजगारासाठी जाण्याच्या संधी उपलब्ध आहेत. औद्योगिक क्षेत्रात आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई येथे दि.३ जूनपासून प्रवेश प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, अनुत्तीर्ण इच्छुक उमेदवारांनी https://admisson.dvet.gov.in या संकेतस्थळावर दि.30 जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज करावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज भरल्यावर जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन प्रवेश अर्ज निश्चित करून त्यानंतर विकल्प सुद्धा भरणे बंधनकारक आहे. प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर एकाच वेळी 100 वेगवेगळ्या व्यवसायासाठी राज्यातील कुठल्याही संस्थेमध्ये आपल्या आवडीनुसार आणि पात्रतेनुसार कुठल्याही व्यवसायाठी विकल्प भरू शकतात.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई येथे प्रवेशासाठी एकूण 120 जागा उपलब्ध आहेत. या संस्थेमध्ये कॉम्प्युटर हार्डवेअर ॲण्ड नेटवर्क मेन्टेनन्स, कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॉमिंग असिस्टंट, डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर हे एक वर्षीय व्यवसाय व इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन ॲण्ड टेक्नॉलॉजी सिस्टिम मेन्टेनन्स हा दोन वर्षीय व्यवसाय असे एकूण चार व्यवसाय प्रशिक्षणासाठी उपलब्ध आहेत.

शासनातर्फे आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी पात्र उमेदवारांना दरमहा 500 रुपये विद्यावेतन देण्यात येते. तसेच प्रशिक्षण पूर्ण करून उत्तीर्ण झाल्यानंतर एक वर्ष कालावधीसाठी विविध आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी करीता पाठविण्यात येते. अधिक माहितीकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई, द्वारा : एल्फिस्टन टेक्निकल हायस्कूल, मुंबई 1, मेट्रो सिनेमासमोर, धोबी तलाव, मुंबई येथे समुपदेशन करण्यात येईल आणि विनामूल्य प्रवेश अर्ज भरून दिले जातील. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी तत्काळ आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राचार्य श्री. निंबाळे यांनी केले आहे.

Protected Content