कौतुकास्पद ! पायाने अपंग असतांनाही वाचवले, बुडणाऱ्या चार जणांचे प्राण

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वत: एका पायाने अपंग असूनही शांतीलाल भोई यांनी माळपिंप्री धरणात बुडणाऱ्या चार जणांचे प्राण वाचविले असून त्यांच्या या धैर्याबद्दल नेरी येथील अनमोल परिवारातर्फे त्यांचा सत्कार व सन्मान करत त्यांना गौरविण्यात आले.

शांतीलाल भोई हे एका पायाने अपंग आहेत. मासेमारी हा त्यांचा व्यवसाय असून रविवारी ते सहकाऱ्यांसह माळपिंप्री धरणवर मासेमारीसाठी गेले होते. यावेळी गावातील काही तरूण गणेश विसर्जनासाठी धरणावर आले. पोहता येत नसतांनाही पाण्यात उतरले. अंदाज न आल्याने सहाजण बुडण्याच्या अवस्थेत असतांना जीवाचा आकांत करीत होते.

हा आवाज ऐकून भोई यांनी त्यांचेकडे धाव घेऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांना सहापैकी चार जणांना पाण्याबाहेर काढून वाचविण्यात यश आले. मात्र यात दोघांचा यात दुर्दैवी मृत्यु झाला. स्वत: अपंग असून भोई यांनी  जीवाची पर्वा न करता चार तरुणाचे प्राण वाचवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.

या निमित्ताने आज मंगळवार, दि. १३ सप्टेंबर रोजी शांतीलाल भोई यांचा अनमोल परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी नेरी बुद्रूक ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्पना कुमावत, अनमोल परिवाराचे किशोर खोडपे, विवेक कुमावत, गणेश पाटील, नाना खोडपे, सागर कुमावत आदी सहकारी उपस्थित होते.

Protected Content