जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मणिपुर राज्यातील आदिवासी महिलावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या. तसेच खडके बु. तालुका एरंडोल येथील वस्तीगृहातील आदिवासी विद्यार्थिनीवर लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी जामनेर तहसील कार्यालयावर आदिवासी एकता परिषद भारत तसेच एकलव्य संघटनेतर्फे भव्य मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चात दोघे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो आदिवासी महिला, पुरुष सामील झाले होते. निवेदनात म्हटले आहे की, मणिपूर राज्यात अनेक दिवसापासून हिंसाचार सुरू आहे. या राज्यातील आदिवासी जनतेचे प्रचंड हाल झाले असून महिला सुरक्षित नाही. काही महिला भगिनींना निर्वस्त्र करून गावातून धिंड काढण्यात आली. त्यांच्यावर बलात्कार केला जात आहे. असे भयंकर निंदनीय प्रकार सुरू असून मणिपूर राज्य सरकार व केंद्र सरकारकडून कोणतिही दखल घेतली जात नाही. शासनाला आदिवासी समाजाबद्दल काहीही घेणे देणे नाही. मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी .बलात्कार करणाऱ्या त्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी ही करण्यात आली आहे .त्याचप्रमाणे एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रुक येथील वस्तीगृहातील आदिवासी विद्यार्थिनीवर लैंगिक शोषण करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देऊन त्या संस्थेवर कायमस्वरूपी कारवाई करून ती संस्था बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी आदिवासी एकता परिषद संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, शालू सिंग शेवाळे, लड्डू मोरे ,राजू मोरे, तसेच एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास मोरे सिताराम सोनवणे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.