मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रातील वेदांता हा सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये हलविण्यात आल्याचे नमूद करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात तब्बल १ लाख ५४ हजार कोटी रूपयांचा वेदांता कंपनीचा प्रकल्प सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. आता मात्र हा प्रकल्प गुजरातमध्ये हलविण्यात आला असल्याचे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. पिस्तूल चालवणं, धक्काबुक्की करण्यापेक्षा महाराष्ट्रात गुंतवणूक कशी येईल यावर लक्ष द्या अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले आहे.
कोणत्याही राज्यात गेले त्याचे दुःख नाही तरी देखील आपल्या राज्यात आलं कसं नाही हा प्रोजेक्ट हे आश्चर्य आहे. ज्या प्रोजेक्टवर एवढं काम करून महाविकास आघाडी सरकारने एवढं सगळं पाठबळ देऊन हा प्रोजेक्ट इथे आला नाही. याचा अर्थ हाच आहे की नवीन गुंतवणूकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही. आज आपण बघत आहात की खोके सरकार हे राजकारणात व्यस्त आहे अशी टीका अदित्य ठाकरे यांनी केली आहे. माझी हीच विनंती राहील खोके सरकारला थोडं पिस्तूल काढणं, धक्काबुक्की करण खोके गुंड गर्दीची भाषा करणं सोडून द्यावं आणि मोठ्या इंडस्ट्रीजना आपल्या राज्यात आणण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल, असा सल्लाही ठाकरेंनी दिला आहे.