जळगाव, प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीकरीता राज्यात मोर्चेबांधणी करण्यासाठी शिवसेनेच्या युवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या ‘जनआशीर्वाद’ यात्रेचा उद्यापासून जळगाव येथून शुभारंभ होणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
खा. राऊत पुढे म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रातील मतदार सातत्याने शिवसेनेच्या पाठीशी राहिला असून त्यामुळेच या यात्रेचा प्रारंभ जळगावातून करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे. ते उद्या सकाळी येथे पोहोचतील आणि येथूनच यात्रेद्वारे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर रवाना होतील. या पत्रकार परिषदेला जिल्ह्याचे शिवसेना नेते व राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ व चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष शरद तायडे हे उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना खा. राऊत यांनी सांगितले की, राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली असून दोन्ही पक्ष समसमान जागांवर लढतील. जळगाव व मुक्ताईनगरच्या जागांबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय होईल. राज्यात जागांचेच नव्हे तर सत्तेचेही समसमान वाटप होईल, असा निर्णय नुकत्याच दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत झाला आहे. त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, असेही ते म्हणाले.
राज्याला एका उमद्या चेहऱ्याच्या नेतृत्वाची गरज आहे, तो चेहरा शिवसेनेकडे आहे. तो चेहरा आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे, असे सांगतानाच ते मुख्यमंत्री होतील का हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. राज्यातील विरोधी पक्ष कुचकामी असल्याने शिवसेनेला सत्तेत असून रस्त्यावर उतरावे लागते, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.