धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्राला आदित्य ठाकरेंसारख्या नव्या दमाच्या मुख्यमंत्र्यांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी जळगाव ग्रामीण या माझ्या विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढावी अशी विनंती, सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. तर मी महाराष्ट्राच्या जनतेच्या भेटीसाठी आलोय. मुख्यमंत्रीपदात कोणताही रस नाही, अशी प्रतिक्रिया युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली. दोघं मान्यवर आज धरणगाव येथील जाहीर सभेत बोलत होते.
धरणगाव येथील इंदिरा गांधी हायस्कुल जवळील मैदानात विजयी संकल्प सभा दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास सुरु झाली. सुरुवातील आपल्या मनोगतात राज्य सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांनी जळगाव ग्रामीण मधून लढावे, अशी विनंती केली. महाराष्ट्राला नव्या दमाच्या नेत्याची गरज असून आदित्य ठाकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राला सर्वात तरुण मुख्यमंत्री मिळेल. महाराष्ट्राच्या हितासाठी मी माझा मतदार संघ सोडायला तयार आहे. फक्त आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढविण्यास होकार द्यावा, असेही ना.पाटील म्हणाले.
तर आपल्या मनोगतात आपल्याला मुख्यमंत्री पदाची कोणतीही लालसा नाही. आपण फक्त महाराष्ट्राच्या जनतेची दु:ख समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. ज्यांनी मतदान केले त्यांचे आभार तर ज्यांनी मतदान केले नाही. त्यांची मनं जिंकायला आलो असल्याचे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले. एवढेच नव्हे तर, कोणतीही तारीख, मुहूर्त न पाहता मी ही यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत तमाम शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत मी महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. घरोघरी जाऊन मतदारांचे आभार मानणार आहे. निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी ही यात्रा नाही. केवळ जनतेचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठीच ही यात्रा आहे, असेही आदित्य पुढे म्हणाले.
यावेळी धरणगाव तालुक्यातील असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर खा.संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ,आ.किशोरअप्पा पाटील, नगराध्यक्ष सलीम पटेल, गटनेते पप्पू भावे, उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील,प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
https://www.facebook.com/AadityaThackerayFc/videos/2568284743190174/