मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत १७ लोकांचा बळी गेला होता. आता ४० दिवसानंतर याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. खालिद यांच्या पत्नीच्या बँक खात्यात घाटकोपर होर्डिंगच्या परवानगीसाठी संबंधित कंपनीने लाखो रुपयेजमा केल्याचा आरोप आहे. या आरोपातून खालिद यांचे निलंबन करण्यात आले आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांना निलंबित करण्यात आले आहे. घाटकोपर हॉर्डिंगला पोलीस महासंचालक कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर परवानगी दिल्याचा आरोप कैसर खालिद यांच्यावर आहे.घाटकोपर दुर्घटनेच्या ४० दिवसानंतर पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. या होर्डिंगला बेकायदेशीरपणे परवानगी देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. होर्डिंग्ज लावण्याची परवानगी देणाऱ्या बीएमसी आणि इतर विभागांच्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई आतापर्यंत न झाल्याने लोकांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर आता गृहविभागाच्या आदेशानंतर पोलीस विभागाने कारवाई केली आहे.
पोलीस महांसचालक कार्यालयाने गृहविभागाला या प्रकरणाचा सविस्तर अहवाल दिल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली. राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात आयपीएस कैसर खालिद यांना पुढील आदेश येईपर्यंत तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्याचे म्हटले आहे. निलंबित कालावधीतनिर्वाह भत्ता, महागाई भत्ता आणि देय असलेले इतर भत्ते अदा केले जातील. यासाठी त्यांनी इतर कोणत्याही नोकरी, व्यवसाय किंवा व्यवसायात गुंतलेले नसल्याचे प्रमाणपत्र सादर केलेले असले पाहिजे.
खालिद यांच्यावर मंजूर निकषांकडे दुर्लक्ष करून घाटकोपर येथे १२० बाय १४० चौरस फूटाचे महाकाय आकाराचे होर्डिंग्ज उभारण्यास परवानगी देत आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. यासाठी त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात संबंधित कंपनीकडून लाखो रुपये जमा केल्याचेही आढळले आहे.डीजीपी कार्यालयाची परवानगी न घेता स्वतःहून होर्डिंग मंजूर केले.यामध्ये प्रशासकीय त्रुटी व अनियमितता आढळून आली आहे.
त्याचबरोबर इगो प्रायव्हेट लिमिटेडच्या माजी संचालिका जान्हवी मराठेने रेल्वे पोलिसांना ४०० टक्के अधिक नफ्याचे आमिष दाखवत घाटकोपर होर्डिंगचे कंत्राट मिळविल्याचे समोर आले आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात पेट्रोल पंपावर जोरदार वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपी भावेश प्रभुदास भिंडे याला यापूर्वीच अटक केली आहे.