शेत पाणंद रस्त्यांसाठी आता मिळणार वाढीव निधी : ना. गुलाबराव पाटील

धरणगाव प्रतिनिधी । आपण राज्यमंत्री असतांना शेत पाणंद रस्त्यांची योजना राज्यात सर्वात पहिल्यांदा मांडली. यानंतर याला कॅबिनेटने मान्यता देऊन आता राज्यभरात या प्रकारातील रस्ते बनत आहेत. आतापर्यंत प्रति किलोमीटरला एक लाख रूपये इतकी तरतूद यासाठी होती. मात्र यापुढे जिल्हा नियोजनमधून हीच रक्कम आता तीन लाख रूपये प्रति किलोमीटर इतकी वाढविता येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

तालुक्यातील दोनगाव खुर्द ते खेडी दरम्यान सुरू असलेल्या शेत रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांनी चक्क मोटारसायकलवर स्वारी करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. तर या कामाला वेग देण्याचे निर्देश देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिले. तर, स्वातंत्र्यापासून पहिल्यांदाच हा रस्ता होत असल्याने परिसरातील शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरील आनंद हा आपल्याला विकास करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी  आवर्जून नमूद केले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यात शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना वेग आलेला आहे. या साठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून पाच कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून बर्‍याच ठिकाणी याची कामे प्रगतीपथावर आहेत. या अनुषंगाने तालुक्यातील दोनगाव खुर्द ते खेडी या शेत रस्त्याच्या कामाला देखील मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. आज दोनगाव येथे एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी थेट दुचाकीवरून सुरू असलेले ठिकाण गाठून या कामाची पाहणी केली. त्यांनी या कामाला वेग देण्याचे निर्देश देऊन उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, शेत पाणंद रस्त्याची योजना आता राज्यात अतिशय व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. सध्या यासाठी एक लाख रूपये प्रति किलोमीटर इतक्या निधीची यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे.  या संदर्भात आपण काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत वाढीव निधीची मागणी केली.  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याला मान्यता दिली आहे. यामुळे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आता शेत पाणंद रस्त्यांसाठी प्रति किलोमीटर तीन लाख रूपयांपर्यंतची तरतूद आता करता येणार आहे. यामुळे साहजीकच रस्त्यांचा दर्जा हा अतिशय चांगला होणार असून याचा थेट लाभ हा शेतकर्‍यांना होणार आहे.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर आजवर दोनगाव ते खिर्डी हा शेतरस्ता तयार करण्यात आलेला नाही. आता या रस्त्याचे काम लवकरच पूर्णत्वाकडे येणार असून याचा परिसरातील शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत असून यातून आपल्याला त्यांच्यासाठी अजून नवनवीन सुविधा पुरविण्यासाठी व परिसराचा विकास करण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.

याप्रसंगी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, माजी सभापती  मुकुंदराव नन्नवरे,  किशोर पाटील, सुरेश पाटील यांच्यासह दोन गावकरी परिसरातील शेतकरी उपस्थित होते .

 

Protected Content