जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमासाठी मुळ तरतूद निधी पेक्षा अधिकचा निधी मिळावा म्हणून प्रयत्न केला होता. वित्त आणि नियोजन विभागाने याची दखल घेऊन १०.०८ कोटी एवढा वाढीव निधी मंजूर केला आहे.
यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांनी यासाठी पाठपुरावा केला असल्यामुळे हा वाढीव निधी मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत.
जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अतिरिक्त मागणी केलेल्या निधी मध्ये बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, शिक्षण, महिला सशक्तीकरण, आरोग्य सेवा, पारधी विकास, महिला व बाल विकास, विद्युत विकास, लघु पाटबंधारे, मागासवर्गीय कल्याण, पशुसंवर्धन, पाणी पुरवठा व स्वच्छता इत्यादी क्षेत्र येणार असून यासाठी दहा कोटी ८ लाख इतका वाढीव नियतव्यय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील आदिवासी भागातील विकासाला गती मिळणार असून आर्थिक उन्नतीस हातभार लागणार असल्याची भावनाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. याबाबतचे वृत्त जिल्हा माहिती कार्यालयाने दिले आहे.
यावल येथील एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी अरूण पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी अचूक नियोजन करून आधीच आदिवासींच्या उत्थानासाठी निधीचे अचूक नियोजन केले आहे. यात आता वाढीस निधीचा बुस्टर डोस मिळाल्याने आदिवासी बांधवांना याचा लाभ होणार आहे.