सावदा ता.रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथे २ मार्च २०२५ रोजी आसेम आदिवासी सेवा मंडळाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार व आदिवासी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील आदिवासी, एसटी, एससी, ओबीसी, भटक्या विमुक्त, एनटी, व्हीजेएनटी समाजातील तसेच इतर समाजातील १० उत्कृष्ट शिक्षकांना आद्य क्रांतिकारक तंट्या मामा भिल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या शिक्षकांना शाल, श्रीफळ, मानपत्र, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर एसएससी व एचएससी परीक्षेत विशेष गुण मिळवून प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना मानपत्र, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य मासुम रहेमान, तसेच आसेमचे संस्थापक अध्यक्ष राजू बि-हाम तडवी, कर्मवीर संघाचे प्रदेशाध्यक्ष इरफान तडवी, सचिव अनिल नजीर तडवी, जिल्हाध्यक्ष मुबारक अलीखा तडवी, युवक जिल्हाध्यक्ष बी. राज, महिला जिल्हाध्यक्ष अलिशानबाई तडवी, आदिवासी पोलिस पाटील समितीचे जिल्हाध्यक्ष रईस जाफर तडवी, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात शिक्षक व विद्यार्थी यांना मार्गदर्शनपर भाषणेही करण्यात आली. या सोहळ्याला जिल्ह्यातील अनेक शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.