नागपूर-वृत्तसेवा | ‘महादेव ॲप”सारख्या ऑनलाइन जुगारावर रोख लावण्यासाठी राज्यात अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी फ्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. सोबतच तारेतारकांना जुगाराच्या जाहिराती करू नये, असे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून ऑनलाइन बेटिंगद्वारे गरिबांची फसवणूक केली जात असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी ए.यू. स्मॉल फायनांस बँकेत बनावट खाती उघडण्यात आली आहे. यात काही बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ मुस्ताकिन याच्यासोबत अमित शर्मा नावाचा आरोपीची भागिदारी आहे. त्यांचा पैसा विजय जैन याने जे.पी. इन्फ्रा या बांधकाम कंपनीत गुंतवण्यात आल्याचे शेलार यांनी सांगितले.
यावर गृहमंत्री म्हणून उत्तर देताना फडणवीस यांनी महादेव ॲपची चौकशी ईडीमार्फत केली जात असल्याचे सांगितले. याशिवाय आरोपींचा हेतूसुद्धा जाणून घेण्यात येणार आहे. ऑनलाइन बेटिंग विदेशातून चालते. त्याच्यावर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकार कायदा करीत आहे. भविष्यात सायबर क्राईम वाढतच जाणार आहे.