पुणे प्रतिनिधी । १९९४ साली रिलीज झालेला गोविंदाचा हिट सिनेमा कुली नंबर १चा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात वरूण धवण गोविंदा यांची भूमिका साकारताना दिसेल आणि त्याच्या अपोझिट सारा अली खान झळकणार आहे. या सिनेमाचे शूटिंग सध्या जोरदार सुरू आहे. नुकतच या सिनेमासाठी आऊटडोअर शूट पुण्याजवळ पार पडत होतं. शूट दरम्यान वरूण धवन सोबत एक मोठा अपघात टळला आहे.
टेकडीच्या कड्यावर गाडी अडकली आहे, अशाप्रकारचे हे दृश्य होते. त्या गाडीतून वरुणला बाहेर यायचं होतं. सुरक्षेखातर शूटिंगपूर्वी अनेकदा या स्टंटचा सरावसुद्धा करण्यात आला होता. पण ऐनवेळी वरुण कड्यावर गाडीत अडकला आणि गाडीचा दरवाचा बंद झाला. गाडी टोकावर होती आणि त्यातून वरुणला बाहेर काढणं मोठं आव्हान होते. मात्र अशा परिस्थितीतही वरुण शांत व संयमी होता. स्टंट साहाय्यकाच्या मदतीने अखेर वरुणला गाडीबाहेर काढण्यात यश आले, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली. सुरक्षेची पुरेपूर काळजी घेऊनसुद्धा हा स्टंट फसला होता. मात्र सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.
“कुली नंबर १” चित्रपट हा रिमेक असून यामध्ये वरुणसोबत सारा अली खान मुख्य भूमिका साकारणार आहे. वरुणचे वडील डेविड धवन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून १ मे २०२० रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.