मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अभिनेता तथा माजी खासदार गोविंदा याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला असून त्याला उत्तर पश्चीम मुंबईतून तिकिट मिळणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता गोविंदा हा शिवसेनेत दाखल होणार असल्याची चर्चा सुरू होती. आज या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले असून ते शिवसेनेत दाखल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे वर्षा बंगल्यावरून बाळासाहेब ठाकरे भवनात दाखल झाले असून त्यांच्या सोबत गोविंदा हे देखील एकाच गाडीतून आले आहेत.
या पार्श्वभूमिवर, आज गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. हातात भगवा देऊन आणि भगव्या रंगाचे उपरणे देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत केले. गेल्या महिन्यात कॉंग्रेसचे माजी खासदार मिलींद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर आज गोविंदा यांच्या रूपाने कॉंग्रेसचा मातब्बर नेता शिवसेनेच्या गळाला लागल्याचे मानले जात आहे. तर मुख्यमंत्र्यांनी गोविंदा यांचे स्वागत केले. ते सर्वांना आवडणारे अभिनेते असून त्यांची कामगिरी मोठी असल्याचे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी दिले.
दरम्यान, गोविंदा यांनी आपल्या मनोगतातून आपण एकदा खासदार बनल्यानंतर पुन्हा राजकारणात येणार असल्याचे कधी वाटले नव्हते. मात्र चौदा वर्षांच्या वनवासानंतर आपण रामराज्याची सुरूवात होते त्या पक्षापासून पुन्हा राजकारणात सक्रीय होत असल्याचे नमूद केले.