कार्यकर्ते काँग्रेसवर नाराज – राधाकृष्ण विखे-पाटील

 

 

ba2d7fe9d9918aaf276a1c35c1355827

 

मुंबई (वृत्तसंस्था) डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसच्या प्रचारापासून लांब राहिलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. माझी भूमिका मी पक्षाकडे पत्राद्वारे स्पष्ट केली आहे. निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यायचा आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे जे वास्तव आहे, ते मी पक्षश्रेष्ठींकडे मांडले आहे. कार्यकर्ते काँगेसवर नाराज आहेत. पक्षनेतृत्वाने ही स्थिती जाणून घ्यायला हवी. लोकसभेपेक्षा विधानसभेत राज्यात मोठ्या घडामोडी घडतील, असा दावाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

विखे पाटील म्हणाले की, माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही. मी भाजपात जाणार आहे, ही चर्चा आमच्याच पक्षांतील काही नेत्यांनी सुरु केली आहे. विधिमंडळ काँग्रेस नेता म्हणून मी काम करतो तेव्हा पक्षनेतृत्वाने आपल्या मागे ठाम उभं राहायला हवं अशी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही. पक्षाने जी जबाबदारी दिलीय, ती मी पार पाडेन, मात्र महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळतेय, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

आघाडी केल्याशिवाय पर्याय नाही, अशा भूमिकेत वावरणार असाल तर पक्षातील कार्यकर्ते सक्षम होणार नाहीत. आघाडी करायची की नाही, हे पक्षनेतृत्वाने ठरवायचे असते. पक्षातील ज्येष्ठ नेते पक्षासाठी काम करतायेत असे वाटत नाही. नेत्यांकडून पक्षाला भक्कम करण्याची भूमिका दिसत नाही. काँग्रेसने कार्यशैलीत सुधारणा केली नाही तर लोकसभेपेक्षा विधानसभेत अधिक फटका बसू शकतो, असा इशाराही विखे पाटील यांनी दिला आहे.

तसेच राज्यातील नेते कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करु शकले नाहीत. नेतृत्व करण्याची क्षमता ज्यांच्यात नव्हती त्यांना नेतृत्व दिलं तर पक्ष उभा कसा राहणार? काँग्रेस पक्षाचा इतका दारुण पराभव महाराष्ट्रात कधीच झाला नाही. ज्या सुधारणा करणं गरजेचे आहे, त्या केल्या गेल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेता केला.

दरम्यान भाजपासोबत जाण्याची अहमदनगरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे. विखे पाटील कुटुंबाबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात प्रेम आहे. ही निवडणूक पक्षीय पातळीवर राहिली नाही. कार्यकर्त्यांनीच डॉ. सुजय विखे पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून कारवाई झाली तरी चालेल अशी मानसिकता कार्यकर्त्यांची आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या बाजूने उभा राहत नाही, अशी नाराजीही त्यांच्यात आहे, असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Add Comment

Protected Content