
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहराच्या मध्यवर्ती भागातील टॉवर चौक परिसरात असलेल्या श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक मंदिरासमोरील अतिक्रमणावर अखेर महापालिकेने कारवाई करत ते हटवले. महापौर दीपमाला काळे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत अतिक्रमण विभागाला तात्काळ कारवाईचे आदेश दिल्यानंतर शुक्रवारी ही धडक मोहीम राबवण्यात आली. या कारवाईमुळे मंदिर परिसरातील रस्ता मोकळा झाला असून मंदिर बांधकामासाठी होणारा अडथळा दूर झाला आहे.

टॉवर चौक परिसरातील श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक मंदिराचे नूतनीकरण आणि बांधकामाचे काम सध्या सुरू आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काही व्यक्तींनी अनधिकृतपणे मोठ्या लोखंडी पेट्या आणि इतर साहित्य ठेवून अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणामुळे मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे सिमेंट, वाळू आणि इतर साहित्य घेऊन येणाऱ्या वाहनांना आत येण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकदा सूचना देऊनही अतिक्रमणधारकांनी जागा मोकळी न केल्यामुळे मंदिर प्रशासनासमोर गंभीर समस्या निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ६ मार्च रोजी सकाळी श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक मंदिर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर दीपमाला काळे यांची भेट घेत निवेदन दिले. मंदिराच्या बांधकामात अडथळा निर्माण होत असल्याची सविस्तर माहिती त्यांनी महापौरांना दिली. या निवेदनाची दखल घेत महापौरांनी कोणतीही विलंब न करता महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला तात्काळ कारवाईचे निर्देश दिले.
महापौरांच्या आदेशानंतर अतिक्रमण विभागाचे पथक तातडीने टॉवर चौक परिसरात दाखल झाले. यावेळी मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर ठेवलेल्या लोखंडी पेट्या आणि इतर अतिक्रमित साहित्य हटवण्यात आले. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे साहित्य जप्त करून कार्यालयात जमा केले. तसेच संबंधित अतिक्रमणधारकांना कडक शब्दांत तंबी देण्यात आली असून भविष्यात पुन्हा अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या कारवाईनंतर महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, जैन मंदिराचा परिसर अत्यंत वर्दळीचा असल्यामुळे येथे कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ देणे योग्य नाही. शहरातील रस्ते वाहनधारक आणि पादचाऱ्यांसाठी मोकळे राहणे आवश्यक आहे. शहरात कुठेही अतिक्रमण आढळल्यास प्रशासन त्यावर तात्काळ कारवाई करेल आणि संबंधितांवर कठोर पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे टॉवर चौक परिसरातील रस्ता मोकळा झाला असून मंदिराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या वाहनांना आता सहज प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे मंदिर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि भाविकांनी महापालिकेच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे.



