
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची कमतरता असताना यावल तालुक्यात बोगस डॉक्टरांचा व्यवसाय तेजीत सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चुकीचे निदान आणि अपुरे वैद्यकीय ज्ञान यामुळे सर्वसामान्य रुग्णांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होत असून आरोग्य यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

यावल तालुका अंतर्गत कोरपावलीसह विविध ठिकाणी ‘झोला छाप’ मुन्नाभाई एमबीबीएस म्हणून ओळखले जाणारे बोगस डॉक्टर अनेक दिवसांपासून सर्रासपणे वैद्यकीय सेवा देत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः कोरपावली येथे एका बंगाली बोगस डॉक्टराने ठाण मांडून उपचार सुरू ठेवले होते. यापूर्वीही त्याच्याविरोधात तक्रारी समोर आल्या होत्या; मात्र ठोस कारवाईअभावी त्याचा व्यवसाय सुरूच असल्याची चर्चा होती.
तक्रारींची दखल घेत सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला भंगाळे यांनी तालुका आरोग्य अधिकारी राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडा सिम अंतर्गत उपकेंद्र मोहराळा हद्दीतील कोरपावली येथे जाऊन संबंधित बोगस डॉक्टरावर नोटीस बजावण्यात आली. या कारवाईदरम्यान आरोग्य सेवक चेतन कुरकुरे, इब्रान पटेल, हनीफ तडवी तसेच आशा सेविका उपस्थित होत्या.
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या नोटीसमध्ये संबंधित व्यक्तीस तत्काळ बोगस वैद्यकीय व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वीही त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचे नमूद करून, पुढे पुन्हा बोगसपणे उपचार करताना आढळल्यास कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. आरोग्य सेवक चेतन कुरकुरे यांच्या उपस्थितीत ही नोटीस देण्यात आली.
दरम्यान, तालुक्यातील इतर भागांतही अशाच प्रकारे मुन्नाभाई एमबीबीएस म्हणून ओळखले जाणारे बोगस डॉक्टर कार्यरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. चुकीच्या औषधोपचारामुळे रुग्णांच्या प्रकृतीत बिघाड होण्याच्या घटना घडत असल्याने प्रशासनाने व्यापक मोहिम राबवून अशा बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.



