
रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात कृषी औषधे आणि रासायनिक खतांची विक्री व्यवस्थित सुरू आहे की नाही, हे तपासण्यासाठी कृषी विभागाने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या तपासणीदरम्यान, केऱ्हाळा येथील श्रीकृष्ण कृषी केंद्रात गंभीर अनियमितता आढळल्याने हे केंद्र एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील इतर कृषी केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशासनाने केलेल्या या धडक कारवाईमुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबेल, अशी अपेक्षा आहे.

७५ कृषी केंद्रांची तपासणी, एकाला ताकीद
कृषी विभागाच्या या तपासणी मोहिमेत रावेर तालुक्यातील सुमारे ७५ कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत बहुतांश केंद्रांवर योग्य कामकाज सुरू असल्याचे आढळले, परंतु बक्षिपूर येथील विकास सोसायटीमध्ये स्टॉक बुकची नोंद योग्य प्रकारे न ठेवल्याने त्यांना ताकीद देण्यात आली आहे. ही तपासणी तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ललित इंगळे यांनी केली. यापुढेही अशा प्रकारची तपासणी नियमितपणे सुरू राहील, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
खरेदी-विक्रीसाठी ‘पॉश मशीन’चा वापर अनिवार्य
श्री. इंगळे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, खते आणि औषधे खरेदी करताना आधार कार्डसहच पॉश मशीनवर व्यवहार करावा. त्याचप्रमाणे, विक्रेत्यांनीही प्रत्येक विक्रीसाठी पॉश मशीनचा वापर अनिवार्यपणे करावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सध्या रावेर तालुक्यात सुमारे एक टन युरिया ऑनलाइन स्टॉकमध्ये उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



