जळगाव प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील टोळी, वरखेडी व उमर्दे या तीन गावांत आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या १० जणांवर महावितरणने पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.
महावितरणच्या एरंडोल ग्रामीण कक्षाच्या सहायक अभियंता लक्ष्मी माने, वरिष्ठ तंत्रज्ञ दीपक साळुंके, तंत्रज्ञ महेंद्र महाजन, तंत्रज्ञ विजय मराठे, विद्युत सहायक दीपक माळी यांच्या पथकाने टोळी, वरखेडी व उमर्दे गावात तपासणी केली असता अनेक ग्राहक लघुदाब वाहिनीवर वायरच्या साह्याने आकडा टाकून वीजचोरी करत असल्याचे आढळून आले. यात टोळी गावात विजय आनंदा मराठे याने 1273 रुपये रकमेची 149 युनिट, शुभम नरेंद्र मराठे याने 637 रुपये रकमेची 75 युनिट, प्रकाश गणसिंग पाटील याने 2823 रुपये रकमेची 330युनिट, ज्ञानेश्वर शांतीलाल पाटील याने 4041रुपये रकमेची 473 युनिट, भगवान जयराम चव्हाण याने 3654 रुपये रकमेची 428 युनिट, रवींद्र पुंडलिक चव्हाण याने 3488 रुपये रकमेची 408 युनिट, सदाशिव जयराम चव्हाण याने 2104 रुपये रकमेची 248 युनिट विजेची चोरी करताना आढळून आले. वरखेडी येथे रावण मोतीलाल पाटील याने 4123 रुपये रकमेची 483 युनिट आणि भावलाल हिलाल पाटील याने 7031रुपये रकमेची 823 युनिट विजेची चोरी करताना आढळून आले. तर उमर्दे गावात भिकन त्र्यंबक पाटील याने 2159रुपये रकमेची 253युनिट विजेची चोरी करताना आढळून आले.
या सर्वांना वीजचोरीचे बिल व प्रत्येकी 2 हजार रुपये तडजोड शुल्क आकारण्यात आले. मात्र दोन्ही रकमा भरण्यास आरोपींनी टाळाटाळ केली आणि महावितरण व शासनाचे नुकसान केले. त्यामुळे महावितरणच्या सहायक अभियंता लक्ष्मी माने यांच्या फिर्यादीवरून सर्व आरोंपीवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये जळगावातील जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर कारवाई महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारूक शेख, धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेशकुमार पवार, एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.