पाचोरा प्रतिनिधी | लखमापूर येथील आदिवासी भिल समाजावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याने अशा समाज कंटकांवर सामाजिक बहिष्कार अधिनियम – २०१६ कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी एकलव्य संघटना, पाचोरातर्फे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना निवेदन देण्यात आले.
शुक्रवार, दि.१७ डिसेंबर रोजी नाशिक जिल्यातील सटाणा तालुक्यात असलेल्या लखमापूर या गावात आदिवासी भिल समाजावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याने अशा समाज कंटकांवर सामाजिक बहिष्कार अधिनियम – २०१६ कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी आज बुधवार, दि.२२ डिसेंबर रोजी एकलव्य संघटना, पाचोरातर्फे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना निवेदन देण्यात आले
यावेळी एकलव्य संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ, जिल्हा संपर्क प्रमुख रोहिदास जाधव, जिल्हा अध्यक्ष संजय सोनवणे, युवा जिल्हा अध्यक्ष रविंद्र सोनवणे, तालुका अध्यक्ष गणेश वाघ, तालुका प्रतिनिधी रमेश मोरे सह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, “शेतकऱ्यांनी व ग्रामपंचायत यांनी मिळून नियमावली करण्यात आली होती की, ‘आदिवासी शेतमजूर आपल्याकडे कमी मजुरीवर कामावर आले नाही तर त्यांच्यावर पूर्ण गावातून सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल’ असे लेखी पत्र काढून व काही अदिवासी महिला दुसऱ्याकडे कामाला जात असतांना सर्व मजूर वर्गाला काही संवर्ण धनदांडग्या लोकांनी रस्त्यात अडवून “तुम्ही दुसरीकडे कामाला जाऊ नका, गेले तर तुम्हाला गावात राहू देणार नाही.” असे म्हणत त्या ठिकाणी आदिवासी महिलांना संबधित जमावाने मारहाण केली.
आदिवासी समाजात दहशतीचे वातावरण तयार करणाऱ्या लोकांवर व लेखी पत्र काढणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामसेवक यांच्यावर देखील आदिवासी भिल समाजावर सामाजिक बहिष्कार टाकला म्हणून सामाजिक बहिष्कार अधिनियम – २०१६ कायद्याअंतर्गत कारवाई करुन आदिवासी समाजाला न्याय मिळावा. व येणाऱ्या काळात अशा घटना घडणार नाहीत. याकरिता शासनाकडून कायद्यांची अंमलबजावणी सक्तीने करावी.” अशा आशयाचे निवेदन पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना देण्यात आले.
फेसबुक व्हिडीओ लिंक :
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1643839072621120