रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्न समारंभ, सण-उत्सव आणि मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजविणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे रावेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी स्पष्ट केले. शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
रावेर पोलिस ठाण्यात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत शहरातील बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची लवकरच दुरुस्ती करण्यात येईल, तसेच वाहतूक समस्या त्वरित सोडविण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शांतता कमिटीच्या सदस्यांनी मोठ्या आवाजात वाजविणाऱ्या डीजेवर सर्वसमावेशक बंदी लागू करण्याचा प्रस्ताव मांडला. डीजेच्या आवाजामुळे होणाऱ्या समस्यांमुळे नागरिकांची झोपमोड होते, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात होणारी गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवण्याची गरज असल्याचे सदस्यांनी सुचविले. यामुळे विद्यार्थ्यांना, महिलांना आणि नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
बैठकीला प्रमुखांची हजेरी
बैठकीस सहायक निरीक्षक अंकुश जाधव, भाजप नेते पद्माकर महाजन, माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी, जिल्हा उद्योग आघाडीचे अरुण शिंदे, भाजप शहराध्यक्ष दिलीप पाटील, डॉ. सुरेश पाटील, शैलेश अग्रवाल, दिलीप कांबळे, महेमूद शेख, उमेश महाजन, ई.जे. महाजन, शरद राजपूत, भावलाल महाजन, बंटी महाजन, आरिफ भाई, अयूब मेंबर, कौसर भाई सादिक मेंबर, असदुल्ला खान, सोपान पाटील, नितीन पाटील, नामदेव महाजन, काझी साहेब सी एस पाटील यांसह अनेक मान्यवर आणि शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते. पोलिस आणि शांतता कमिटीने शहरातील समस्यांवर एकत्रित तोडगा काढण्याचे ठरविले असून, नागरिकांना सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.