जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एसटी वर्कशॉप जवळील लक्ष्मणभाऊ नगरात घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर करून काळाबाजारात विक्री करणाऱ्या तरुणावर शनिपेठ पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत गुरूवार ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिपेठ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एसटी वर्कशॉपसमोरील लक्ष्मणभाऊ नगर परिरात घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर करून काळाबाजार होत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना मिळाली. त्यानुसार शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी गुरुवार ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता छापा टाकून कारवाई केली. यामध्ये घरगुती गॅसचे ३ गॅस सिलेंडर आणि गॅस भरण्याचे साहित्य असा एकूण १२ हजार ५१० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल राहुल घेटे यांच्या फिर्यादीवरून मंगेश सुरेश कुवर (वय-३६) रा. लक्ष्मणभाऊ नगर, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे करीत आहे.