धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरात मोकाट गुरे, ढोरे यांचे प्रमाण वाढल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत होता. तसेच, नागरिक आणि विशेषतः शाळकरी मुलांमध्ये यामुळे घबराटीचे वातावरण पसरले होते. यासंदर्भात नगरपरिषदेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेत, नगरपरिषदेने संबंधित गुरांच्या मालकांना आपापल्या जनावरांचे पालनपोषण खाजगी जागेत करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जाहीर आवाहन पत्रकाद्वारे केले होते.
त्यानुसार, आज, मंगळवार, २२ जुलै २०२५ रोजी धरणगाव नगरपरिषदेच्या पथकामार्फत शहरात मोकाट गुरे पकडण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शहरातील ७ मोकाट गुरे पकडून त्यांना शहरातील गोशाळेत जमा करण्यात आले आहे. तसेच, पकडलेल्या या गुरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गोशाळेत जमा केलेल्या या जनावरांचे योग्य पालनपोषण करण्यात येणार असून, सध्या सुरू असलेल्या लंपी आजाराच्या साथीची गंभीर दखल घेत, या गुरांवर उपचारासाठी पशुसंवर्धन विभागालाही कळविण्यात आले आहे.

सदर मोहीम मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, मुकादम रामकृष्ण महाजन व अण्णा माळी, अरुण पाटील, गोपाळ चौधरी यांच्यासह सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे राबवली.
मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी पुन्हा एकदा शहरातील मोकाट गुरांच्या मालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपली जनावरे स्वतःच्या खाजगी जागेत बांधून त्यांचे पालनपोषण करावे. अन्यथा, नगरपरिषदेतर्फे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, शहरातील मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी सदर मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.



