चिदंबरम यांच्यावर सूडबुद्धीतून कारवाई : राहुल गांधी

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडियाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. याप्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने चिदंबरम यांना दोन लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. या निकालानंतर काँग्रेसकडून ‘अखेर सत्याचाच विजय झाला, सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया देण्यात आली. यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया देताना, चिदंबरम यांची १०६ दिवसांची अटक ही सूडबुद्धीतून केलेली कारवाई होती, असा आरोप ट्विटद्वारे केला आहे.

 

पी. चिदंबरम यांची १०६ दिवसांची अटक ही सूडबुद्धीतून केलेली कारवाई होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्याबद्दल मला आनंद आहे. मला विश्वास आहे की, निष्पक्ष सुनावणीत ते स्वतःला निर्दोष सिद्ध करतील. असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
याअगोदर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना, आम्ही कधीच सूडबुद्धीने वागलो नाही, मात्र काँग्रेस सरकारच्या

काळात चिदंबरम गृहमंत्री असताना माझ्यावर तसेच, मोदीजी आणि अमित शाह यांच्यावर चुकीचे खटले दाखल करण्यात आले होते. अखेर आमची निर्दोष मुक्तता झाली असल्याचे म्हटले होते. तसेच, चिंदबरम यांच्या विरोधात असलेल्या खटल्यातील पुरावे आहेत, तपास सुरू आहे. सध्या प्रकरण न्यायालयात आहे, त्या ठिकाणीच यावर निर्णय होईल, असेही गडकरी म्हणाले होते.

Protected Content