Home Cities अमळनेर देवगाव खून प्रकरणी आरोपीस 10 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा 

देवगाव खून प्रकरणी आरोपीस 10 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा 


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देवगाव येथे 2021 मध्ये घडलेल्या जिवे ठार मारण्याच्या प्रकरणात अमळनेर येथील सत्र न्यायालयाने आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33, रा. पुनगाव ता. चोपडा, हल्ली मु. देवगाव ता. चोपडा) याला 10 वर्षे सश्रम कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे परिसरात खळबळ उडाली असून पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.

अडावद पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 149/2021 तसेच सेशन केस क्रमांक 13/2022 अंतर्गत हा खटला चालविण्यात आला. दि. 14 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास देवगाव येथील प्लॉट भागात फिर्यादी भावना रविंद्र पाटील यांच्या घरासमोर ही घटना घडली होती. फिर्यादीचे पती रविंद्र विश्राम पाटील हे दारूच्या नशेत पत्नीशी वाद घालत असताना आरोपी चंद्रशेखर सपकाळे याने वादात हस्तक्षेप केला. “मला का शिवीगाळ करतो?” असा जाब विचारत त्याने रविंद्र पाटील यांच्याशी वाद घातला. वाद वाढत गेल्यानंतर आरोपीने त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून खाली पाडले.

यानंतर आरोपीने जवळच असलेले बैलगाडीचे लाकडी शिंगाडे काढून रविंद्र पाटील यांच्या पोटावर व पाठीवर गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी 16 ऑक्टोबर 2021 रोजी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे झालेल्या गंभीर जखमांमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

सुरुवातीला आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम 302 व 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी मा. जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे अॅड. के. आर. बागुल मंगरूळकर यांनी प्रभावी युक्तिवाद करत एकूण 9 साक्षीदार तपासले. फिर्यादी पत्नी, मयताचे वडील तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. तसेच डॉ. निलेश देवराज यांनी सादर केलेल्या छवविच्छेदन अहवालामुळे मृत्यूचे कारण स्पष्ट झाले.

पुरावे व साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविले. भा.दं.वि. कलम 304 (भाग 2) अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीस 10 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे.

या प्रकरणाच्या तपासात पोलीस कॉन्स्टेबल सतीष भोई (अडावद पो. स्टे.), पी.पो.कॉ. राहुल रणधीर, एस.आय. उदयसिंग सांळुके (पारोळा पो. स्टे.), पो.हे.कॉ. पुरुषोत्तम वाल्डे (चोपडा ग्रामीण), पो.हे.कॉ. प्रमोद पाटील (चोपडा शहर) तसेच पो.कॉ. भरत इशी (मारवड पो. स्टे.) यांनी सहकार्य केले.


Protected Content

Play sound