यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सांगवी फाटा ते डोंगर कठोरा रस्त्यावर झालेल्या खुनातील आरोपी निष्पन्न झाले असून ते लवकरच गजाआड होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, आज सकाळी यावल तालुका एका तरूणाच्या खूनामुळे हादरला. तालुक्यातील चितोडा येथील राहणारे मनोज संतोष भंगाळे या वय ४० वर्ष व्यक्तिचा अत्यंत क्रूर पध्दतीत खून करून त्यांचा मृतदेह सांगवी बुद्रुक शिवारातील चंद्रकांत निंबा चौधरी यांचे शेतात आज पहाटे आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
रविवारी दिनांक २१ ऑगस्टच्या रात्री मनोज भंगाळे यांनी जेवण करून आपली मोटर सायकल क्रमांक एमएच १९डी आर ९५९८या गाडीवरून आपण बाहेर जात असल्याचे कुटुंबियांनी सांगितली. यानंतर आज सोमवारी सकाळी लगतच्या शेतातील शेतकर्यास भंगाळे यांचा मृतदेह दिसल्यानंतर घटनेची खबर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पहाटेची ही खबर वार्यासारखी पसरल्याने परिसर हादरला.
दरम्यान, घटनास्थळी फैजपूर उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, फौजदार विनोद खांडबहाले सहकार्यांसह घटनास्थळी पोहोचले. ठसेतज्ज्ञांनी परिसरातून पुरावे जमा केलेत. तर श्वान पथकाने या खुनाचा काही सुगावा मिळतो का ? याची पाहणी केली.
मनोज संतोष भंगाळे यांच्या मृतदेहावर पोटावर तसेच मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केले असून मृतदेह पालथ्या अवस्थेत होता. मृत मनोज भंगाळे यांची मोटर सायकल मृतदेहापासून पाच-सहा फुटाचे अंतरावर मिळून आली आहे.
या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. तसेच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून यातील आरोपी निष्पन्न केले असून त्यांची झाडाझडती सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच पोलीस त्यांना गजाआड करतील अशी शक्यता आहे. याबाबत पोलीस प्रशासन लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.