मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्य संख्यांबाबत आधीच्या सरकारचा निर्णय रद्द करून लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या असेल असा निर्णय घेण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सरकारचे अनेक निर्णय विद्यमान सरकारने रद्द केले आहेत. यात नगराध्यक्ष आणि सरपंच हे थेट जनतेतून निवडून जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. या पाठोपाठ आता नवीन प्रभाग आणि वॉर्ड रचना रद्द करण्यात आली आहे. २०१७च्या अनुसार आता यापुढील महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे वाढलेले प्रभाग आणि वॉर्ड देखील रद्द होणार आहेत. यासोबत राज्य सरकारने सदस्य संख्यांबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत सध्याच्या २३६ सदस्यांऐवजी २२७ सदस्य संख्या होईल. तसेच इतर महानगरपालिकांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्येत सुधारणा होणार आहे. ३ लाखांपेक्षा अधिक व ६ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ६५ इतकी तर कमाल संख्या ८५ इतकी असेल. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त ७५ करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.