मुंबई- जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी चौकशी लावली ही सुबुद्धीने नाही तर कॅग’च्या अहवालानुसार नेमण्यात आली असून भाजपाने खोटारडेपणा करु नये अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महेश तपासे यांनी भाजपकडून एसआयटी आणि कोरोना अंमलबजावणीवरुन महाविकास आघाडीवर होणाऱ्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला.
भाजपाची सत्ता असताना देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना आणली. या योजनेमुळे महाराष्ट्रातील मोठा भाग टॅकरमुक्त होईल असे मोठे दावे केले होते. यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जाहिरातबाजी केली मात्र कॅगने या योजनेवर ताशेरे मारल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असेही महेश तपासे म्हणाले.
या योजनेत एकूण २२ हजार ५६८ गावे व ६ लाख कामांचा समावेश होता आणि त्यासाठी ९ हजार ६३४ कोटी रुपये खर्च झाला आहे. ज्याप्रमाणे सांगण्यात आले होते तेवढी भूजल पातळी वाढली नाही. उलट टँकरमुक्त होण्याऐवजी टँकरची संख्या वाढल्याचे समोर आले. या सगळ्या प्रकरणाचे सत्य बाहेर आले पाहिजे. ही भूमिका राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे कॅगने मारलेल्या ताशेरे यावर ही एसआयटी नेमण्यात आल्याचे तपासे यांनी स्पष्ट केले.
यावेळी महेश तपासे यांनी आरोग्य खात्याकडून कोरोना काळात करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची आणि जनतेसाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. महाराष्ट्र हा १०० टक्के कोरोनामुक्त होईल परंतु त्यासाठी लोकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी सरकार वेळोवेळी सूचना आणि माहिती देत आहे त्याचे पालन करावे असे आवाहनही महेश तपासे यांनी केले.