सुदैवाने टळला अनर्थ : जाणून घ्या ‘त्या’ स्कूल बसच्या अपघाताचा ‘ऑन-द-स्पॉट’ रिपोर्ट !

पहूर, ता. जामनेर-रवींद्र लाठे | आज सकाळी झालेल्या स्कूल बसमधील विद्यार्थी आणि शिक्षकांचे दैव बलवत्तर असल्याने अनर्थ टळला. अन्यथा या अपघातात मोठी हानी होण्याची शक्यता होती. आम्ही या संदर्भात आपल्याला ‘ऑन-द-स्पॉट’ रिपोर्ट सादर करत आहोत.

आज सकाळी पहूर ते शेंदुर्णीच्या दरम्यान उलटल्याने अपघात झाला. सदर स्कूल बस ही शेंदुर्णी येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेची क्रमांक-दोनची बस होती. या बसचा क्रमांक एमएच-१९ वाय-५७७८ हा होता. नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन बस विद्यालयाकडे येत होती. दरम्यान, बसच्या खालील बाजूस असलेला पाटा तुटल्यामुळे वाहकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस उलटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोलगट भागात पडली. येथे असलेल्या झाडाला धडक बसल्याने झाड अक्षरश: मधून तुटून पडले. याच वेळी बसवर निंबाच्या वृक्षाची फांदी देखील पडली.

लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे प्रतिनिधी रवींद्र लाठे हे प्रत्यक्ष अपघातस्थळी वृत्तांकन करण्यासाठी गेले असता तेथे अतिशय भीषण दृश्य दिसून आले. बस उलटून खाली पडल्यानंतर झाडावर आदळल्यामुळे झाडाचे अक्षरश: दोन तुकडे झाले होते. तर स्कूल बसची देखील मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. अवघ्या काही सेकंदात घडलेल्या या अपघातामुळे यातील विद्यार्थी आणि शिक्षकांना नेमके काय होतेय हे काहीही उमगले नाही. तर बस आदळल्यानंतर जोरदार हादरा बसल्याने बहुतेकांना इजा झाली. यामुळे लागलीच किंकाळ्यांनी परिसर हादरला.

बसमधून सर्व जण कसे तरी बाहेर रस्त्यावर आले. लागलीच काहींनी याची माहिती आपल्या पालकांना दिली. यामुळे पहूर येथून अनेक जण मिळेल त्या वाहनाने घटनास्थळी आले. येथून खासगी वाहनांनी जखमींना पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर, जास्त जखमा झालेल्यांना रूग्णवाहिकेतून रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. यातील काही जणांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहेत. तर बहुतांश विद्यार्थी आणि शिक्षकांवर पहूरच्या ग्रामीण रूग्णालयातच उपचार करण्यात आल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांनी या अपघाताची नोंद घेऊन चौकशी सुरू केली होती.

Protected Content