पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । राखेने भरलेला टँकर रस्त्यावरील भराव खचून उलटल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. ही घटना पहूर – जामनेर महामार्गावर सोनाळा फाटयाजवळ घडली.
याबाबत वृत्त असे की, सध्या महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत भरावाचे काम सुरू आहे. दिपनगरहून परभणी कडे ४० टन राख घेऊन जाणारे राधे एंटरप्रायजेस, परळीचे टँकर ( क्र. एम .एच .४४ -९२२७ ) कच्च्या रस्त्यावरील भराव खचल्यामुळे पलटी झाले. या अपघातात सुदाम बाबूराव पारडे (वय २७ रा. अमलगाव ता. गंगाखेड, जि.परभणी) या चालकाचा टँकरखाली दाबल्या गेल्याने जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जामनेरला शासकिय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी सतीश गोरोबा जंगले (रा. सिद्धार्थनगर, जि . परभणी) यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास श्री. शिंपी करित आहेत . गेल्या महिन्यातही या रस्त्यावर पाणी टँकरच्या अपघातात एकाजनाचा मृत्यू झाला होता.यातच आता पुन्हा एकाचा बळी गेल्यामुळे कंत्राटदाराने रस्त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष्य देण्याची गरज आहे .