जळगाव, प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे नवसाला दुचाकीने जाणाऱ्या तरुणांची दुचाकी समोर दगड आल्याने अपघात होऊन तिघेजण गंभीररित्या जखमी झाले. तिघांना उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, नारायण रामा पाटील रा.मुक्तळ ता. बोदवड यांच्याकडे नवसाचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने नवसाला लागणारा सामान पोहोचवण्यासाठी दुचाकीने योगेश रमेश पाटील (वय १९), संदीप समाधान भिल (वय २९) दोन्ही रा. नाडगाव ता.बोदवड आणि अतुल ठाणसिंग पाटील (वय २५) रा. मुकपाठ घाट औरंगाबाद असे तिघेजण ट्रिपल सीट जाऊन बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील हनुमान मंदिराजवळ पोहोचविला. त्यानंतर रात्री तेथेच मुक्काम केला. सकाळी ४ वाजेच्या सुमारास मुक्तळ गावाला येण्यासाठी तिघेजण ट्रिपल सीट येत असतांना नाडगावाच्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रस्त्यावरच्या पुलाचे काम सुरू होते. अचानकरित्या दुचाकी समोर अंधारात मोठा दगड आल्याने दुचाकी आदळून खाली पडली. त्यात तिघे तरुण गंभीररित्या जखमी झाले. तिघांना तातडीने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.