जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्या मान्य न झाल्यास कृषीमंत्र्यांच्या गाडीची हवा काढण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जळगाव ग्रामीणचे उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे. आज जळगाव येथील कृषी सहाय्यकांच्या धरणे आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
कृषी सहाय्यकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये त्यांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे, त्यांना लॅपटॉप उपलब्ध करून देणे, वाहतूक भाड्याची तरतूद करणे आणि कृषी विभागाचा आकृतीबंध तात्काळ मंजूर करणे यांचा समावेश आहे. या मागण्या मान्य न झाल्यास सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे.
यावेळी प्रा. भाऊसाहेब सोनवणे म्हणाले, “कृषी सहाय्यक हे शेतकर्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे काम करतात. त्यांच्या मागण्या रास्त आहेत आणि सरकारने त्या तातडीने मान्य केल्या पाहिजेत. जर सरकारने दुर्लक्ष केले, तर शिवसेना कृषी सहाय्यकांच्या पाठीशी उभी राहील आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.” असा इशारा दिला आहे.