मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – ओबीसी आरक्षण निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आठ ते पंधरा दिवसात घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर ओबीसी आरक्षण मुद्द्यावर राजकीय घडामोडींना वेग आला असून गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली तर उद्या शनिवारी मुंबईत भाजपची बैठक घेण्यात येणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले असून या ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकिंचे सत्र सुरू झाले आहे. ओबीसी आरक्षणाबाबत पुढील रणनिती ठरवण्यासाठी भाजपाच्या ओबीसी मोर्चाची बैठक उद्या शनिवारी घेण्यात येणार असून या बैठकीत काय निर्णय घेतले जातात, यावर पुढील समीकरणं अवलंबून असणार आहेत.
या बैठकीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा नेते संजय कुटे, योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात येणार आहे. ज्या प्रभागांमध्ये ओबीसीचं आरक्षण रद्द झाले आहे त्या ठिकाणी ओबीसी उमेदवारच देणार असल्याची भूमिका चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे.
ओबीसी आरक्षण संदर्भात मध्यप्रदेशात इम्पिरीकल डेटा जमा करण्यात येत आहे. तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या निर्णयावर तातडीने फेरविचार याचिका दाखल करावी अशी मागणीसह आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नये, तसेच निवडणूक झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार यासंदर्भातही भाजपच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
याबाबत
आगामी काळात जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या तर आरक्षण हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा राहणार असून एका बाजूला भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याबाबत रणनिती तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सरकारमध्येसुद्धा अनेक खलबते सुरू आहेत. त्यामुळे हे लक्षात घेऊनच सगळे राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत.