धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर असलेल्या घरकुल योजनेच्या दुसरा हप्ता मंजूर करण्याच्या मोबदल्यात १० हजाराची लाचेची रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शविल्याने धरणगाव पंचायत समितीचे गृहनिर्माण अभियंत्यासह खासगी पंटरवर जळगाव लाचलुचपत विभागाने कारवाई केली. याप्रकरणी बुधवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार यांनी धरणगाव पंचायत समिती येथे पंतप्रधान आवास योजना अंतर्गत मंजूर असलेल्या घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान धरणगाव पंचायत समितीचे गृहनिर्माण अभियंता गणेश पाटील यांनी दुसऱ्या हप्त्याची रक्कम ही बँकेत जमा करण्याच्या मोबदल्यानंतर तक्रारदार यांच्याकडे १० हजारांची लाचेची मागणी १४ जुलै रोजी केली होती. आणि सदरची रक्कम ही खासगी पंटर सागर कोळी रा. निंभोरा ता. धरणगाव यांच्या मार्फत स्विकारण्यास सहमती दर्शविली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागाला याबाबत तक्रार दिली. त्यानुसार पथकाने पडताळणीसाठी सापळा रचला. त्यानुसार पैसे स्विकारण्यास सहमती दर्शविल्याने पोलीसांनी दोघांवर कारवाई केली. याप्रकरणी लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पंचायत समितीचे गृहनिर्माण अभियंता गणेश पाटील आणि खासगी पंटर सागर कोळी याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक योगेश ठाकूर हे करीत आहे.




