Home Cities जळगाव हिंगोलीत अभाविप देवगिरी प्रदेशाचे ६० वे अधिवेशन उत्साहात ; २९५ प्रतिनिधींची उपस्थिती 

हिंगोलीत अभाविप देवगिरी प्रदेशाचे ६० वे अधिवेशन उत्साहात ; २९५ प्रतिनिधींची उपस्थिती 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अभाविपचे देवगिरी प्रदेशाचे ६० वे प्रदेश अधिवेशन श्री संत नामदेव नगरी, हिंगोली येथे २३, २४ व २५ जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडले या अधिवेशनाचे वृत्त आणि निर्णय अधिकृतरीत्या माध्यमांपर्यंत पोहोचवण्यासाठी जळगाव येथे पत्रकार परिषदेचे आयोजन जळगाव येथे करण्यात आले. ही पत्रकार परिषद मंगळवार, दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता ‘छात्रशक्ती’ अभाविप कार्यालय, पीव्हीआर समोर संपन्न झाली.

यावेळी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, प्रदेश कार्यसमिती सदस्य कु. गायत्री पाटील, महानगर सहमंत्री वरद पांढारकर व वरद गिरिष पंढारकर संपन्न झाली. डॉ. वरुणराज नन्नवरे सध्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस इंटर्नशिपचे शिक्षण घेत असून, विद्यार्थी प्रश्नांवर त्यांची ठाम भूमिका ओळखली जाते. कु. गायत्री बाबू पाटील या नाहाटा महाविद्यालय, भुसावळ येथे शिक्षण घेत असून सध्या त्या प्रदेश कार्यसमिती सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून ओळखली जाते. गेल्या ७७ वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात विधायक शक्ती म्हणून कार्यरत असलेल्या अभाविपचे देवगिरी प्रदेशाचे ६० वे प्रदेश अधिवेशन श्री संत नामदेव नगरी, हिंगोली येथे २३, २४ व २५ जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडले. या तीन दिवसीय अधिवेशनात खानदेश व मराठवाडा विभागातील एकूण २९५ प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला तळोदा (जि. नंदुरबार) येथून कलशयात्रा तसेच किनवट येथून जनजाती गौरव यात्रा हिंगोली येथे दाखल झाल्या. या यात्रांमधून जनजाती समाजाची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, शौर्य, बलिदान आणि राष्ट्रनिर्मितीतील अमूल्य योगदान प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले.

अधिवेशनस्थळी भारतरत्न डॉ. नानाजी देशमुख यांच्या कार्यावर आधारित भव्य प्रदर्शनी उभारण्यात आली होती. या प्रदर्शनीत अभाविपचे विविध आंदोलन, उपक्रम, अभियान आणि संघटनात्मक कार्य प्रभावीपणे मांडण्यात आले होते. या प्रदर्शनीला प्रतिनिधींसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भेट देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचारक स्वप्नील चमणीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अभाविपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरभीबेन दवे, देवगिरी प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश मुंढे, प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांच्यासह विविध स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या अधिवेशनात शैक्षणिक व सामाजिक सद्यस्थितीवर आधारित तीन महत्त्वाचे प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत शारीरिक, मानसिक व आरोग्यदायी शिक्षण मिळणे हा विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार असल्याचा ठराव मांडण्यात आला. डिजिटल सुरक्षितता, सांस्कृतिक जतन तसेच महिला आरोग्य व पोषणातील कमतरतेसाठी शासनाने अधिक प्रयत्नशील राहावे, यावर दुसरा ठराव संमत करण्यात आला. तसेच उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची वाढती अनुपस्थिती ही गंभीर समस्या असल्याचा मुद्दा तिसऱ्या प्रस्तावाद्वारे मांडण्यात आला.

‘विकसित भारत @२०४७’ या विषयावर मध्य क्षेत्रीय संघटन मंत्री  चेतस सुखडिया यांनी मार्गदर्शन केले, तर ‘अभाविप : काल, आज आणि उद्या’ या विषयावर पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री  गीतेश चव्हान यांनी विचार मांडले. ‘भारतीय ज्ञान परंपरा : दिशा व दर्शन’ या विषयावर आचार्य  श्रेयस कुऱ्हेकर यांनी सखोल मार्गदर्शन करत भारतीय परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले.

शैक्षणिक परिसंवादात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाढती अनुपस्थिती या विषयावर सखोल चर्चा झाली. या विषयाची मांडणी अभाविप केंद्रीय कार्यसमिती सदस्य कु. वैभवी ढिवरे यांनी केली. उद्योग क्षेत्राची भूमिका उद्योजक  प्रवीण सोनी यांनी मांडली, तर कुलगुरू प्रा. डॉ. विजय माहेश्वरी यांनी विद्यापीठाची भूमिका आणि भविष्यातील योजना स्पष्ट केल्या. या परिसंवादाचे संकलन प्रा. डॉ. हंसराज जोशी यांनी केले.

अधिवेशनाच्या निमित्ताने हिंगोली शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विद्यार्थी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील विविध ठिकाणी नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत स्वागत केले, तर काही ठिकाणी पाणी व चॉकलेटचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.

यानंतर झालेल्या जाहीर सभेत छात्र नेत्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर आपले विचार मांडले. या सभेस अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री पायल किनाके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अधिवेशनाचा समारोप प्रदेश संघटन मंत्री   सिद्धेश्वर लटपटे यांच्या भाषणाने झाला. ध्वजावतरणाने अधिवेशनाची औपचारिक सांगता करण्यात आली.


Protected Content

Play sound