जळगाव प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाला मरेपर्यंत जन्मठेपेसह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. आर . जे . कटारिया यांनी सुनावली आहे . या पीडितेवर अत्याचाराची घटना घडली तेंव्हा ती ९ वर्षांची होती.
अधिक माहिती अशी की, उत्राण येथे हि घटना २१ एप्रिल २०१९ रोजी घडल्यानंतर कासोदा पोलीस ठाण्यात या खटल्यातील दोषी लोटन फकिरा पाटीलच्या विरोधात गु.र.नं. २१ /१९ , भा. द. वि . कलम ३७६ (अ, ब), लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण कायदा कलम ४, ५ (आय), ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता २१ एप्रिल २०१९ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेतील या आरोपीला त्याच दिवशी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास उत्राण गावातून पोलिसांनी अटक केली होती . पोलिसांनी अटक केल्यापासून हा दोषी न्यायालयीन कोठडीत आहे . तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी २४ जून २०१९ रोजी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते . १५ नोव्हेंबर २०१९ रोजी खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाल्यानंतर १४ साक्षीदार तपासण्यात आले . पीडितेची आई, वडील, पंच, पोलीस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, न्याय वैद्यक प्रयोगशाळेतील कर्मचारी, डी.एन.ए. तज्ज्ञ आणि ग्राम विकास अधिकाऱ्याचा साक्षीदारांमध्ये समावेश होता . ६ मार्च २०२० रोजी शेवटचा साक्षीदार तपासण्यात आला होता. प्रभावी युक्तिवाद आणि निःसंशय साक्षी पुराव्यांच्या आधारावर या आरोपीला न्यायालयाने शिक्षा सुनावली फिर्यादी पक्षाची बाजू जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांनी तर आरोपीची बाजू ॲड. सचिन पाटील यांनी मांडली .