गैरवर्तन करणाऱ्या नेत्यांना पक्षातून हाकलणार – पंतप्रधान

Narendra Modi Indian elections 2019 Modi Narendra Modi news 938x450

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) राजकीय नेत्यांचे गैरवर्तन अजिबात खपवून घेतले जाणार नाही. राजकारणामध्ये अनुशासन असायला हवे. गैरवर्तन करणाऱ्या नेत्यांना पक्षातून हकलून देण्यात येईल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (दि.२) भाजप नेता आकाश विजयवर्गीयवर यांचेनाव न घेता टीका केली. एका शासकीय अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्यामुळे आकाश विजयवर्गीय चर्चेत आला आहे.

 

आकाश विजयवर्गीय भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आहे. इंदूर येथे अतिक्रमणविरोधी कारवाई करायला आलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आकाश विजयवर्गीयने भर चौकात बॅटने मारहाण केली होती. यामुळे त्याच्यावर सर्वच बाजूंनी सडकून टीका करण्यात येत आहे. शासकीय अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी त्याला अटकही करण्यात आली. त्यानंतर जामिनावर बाहेर सुटल्यावरही त्याने आपली दादागिरी सुरूच ठेवली असून मला पुन्हा ‘फलंदाजी’ करण्याची वेळ आणू नका, अशी ताकीदच दिली आहे.

या सगळ्या प्रकरणावर मोदी गप्प का ? असाही सवाल विचारण्यात येत होता. आता टाइम्स नाऊशी बोलताना मोदींनी याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नेत्यांनी गैरवर्तन करू नये, आपली पातळी सोडू नये असे मत मोदींनी व्यक्त केले आहे. तसंच अशाप्रकारची वर्तणूक करणाऱ्यांना भाजपमध्ये थारा नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. तेव्हा आतातरी आकाश विजयवर्गीय सुधारतो का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या आधीही शपथविधी सोहळ्यानंतर मनोगत व्यक्त करताना पंतप्रधानांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना आपल्या वर्तनाबाबत सखोल मार्गदर्शन केले होते. त्यातून नेत्यांनी बोध घेणे गरजेचे आहे.

Protected Content