रशियातील कोरोना लस प्रभावी !; २१ दिवसांत शरिरात ॲण्टीबॉडी तयार करण्यास सक्षम

लंडन वृत्तसंस्था । रशियाने कोरोना संसर्गाला अटकाव करणारी विकसित केलेली लस प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यात ही लस अतिशय सुरक्षित असल्याचे आढळले आहे. रशियाची स्पुटनिक व्ही ही लस टोचल्यानंतर ४२ दिवसानंतरही कोणतेही गंभीर साइड इफेक्टस जाणवले नाहीत. ही लस २१ दिवसांत शरिरात अॅण्टीबॉडी तयार करण्यास सक्षम आहे.

वैद्यकीय नियतकालिक लॅसेंटमध्ये प्रकाशित अहवालानुसार, दोन भाग असलेल्या लशीत दोन वेक्टर्स आहेत. त्यामुळे SARS-CoV-2 स्पाइक प्रोटीनसाठी वेगळ्या पद्धतीने विकसित करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एडेनोवायरस वैक्टरचा वापर दीर्घ काळापासून करण्यात येत आहे. अनेक क्लिनिकल अभ्यासात ही लस सुरक्षित असल्याचेही समोर आले होते. सध्या अनेक कोविड-१९ ची कँडिडेट लस वेक्टर्सचा वापर करत SARS-CoV-2 चा स्पाइक प्रोटीनला लक्ष्य करतात. जुलै महिन्यातही ऑक्सफोर्डच्या लस चाचणीच्या निकालातही लस सुरक्षित असल्याचे समोर आले होते. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत असल्याचे समोर आले होते. दुसऱ्या चाचणीच्या परिणामातही ही लस २८ दिवसांमध्ये टी सेल (अॅण्टी बॉडी) निर्माण करण्यास सक्षम आहे.

रशियाची लस चाचणी ही दोन रुग्णालयात करण्यात आली. यामध्ये १८ ते ६० वर्षापर्यंतच्या निरोगी व्यक्तींचा समावेश होता. चाचणीसाठी या व्यक्तींची नोंदणी करण्यात आल्यानंतर त्यांना आयसोलेट करण्यात आले होते. त्यानंतर लस टोचण्यात आल्यानंतर २८ दिवसांपर्यंत त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले. लशीचे आणखी मूल्यांकन करण्यासाठी वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्ती, वयस्कर व्यक्ती, आजारी व इतर आजार असलेल्या लोकांना लस देऊन परिणामांचे संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले.

Protected Content