बंगळुरू–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय युवा फलंदाज अभिषेक शर्मा याने ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला. केवळ ५२८ चेंडूत १००० धावा पूर्ण करत अभिषेकने जागतिक स्तरावर सर्वात वेगाने १००० धावा करणारा फलंदाज म्हणून इतिहास रचला. या कामगिरीने त्याने भारतीय स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याचा विक्रम मोडून नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरुवात करताना अभिषेक शर्माने दमदार फटकेबाजी करत फक्त ११ धावा पूर्ण करताच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १००० धावांचा टप्पा पार केला. या क्षणापासूनच संपूर्ण मैदानात आनंदाचा आणि अभिमानाचा जल्लोष झाला.

यापूर्वी हा विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर होता. सूर्यकुमारने ५५३ चेंडूत १००० धावा पूर्ण केल्या होत्या, परंतु अभिषेकने फक्त ५२८ चेंडूंत हा टप्पा गाठत त्याचा विक्रम मागे टाकला. त्याच्यानंतर इंग्लंडचा फिल सॉल्ट (५९९ चेंडू), ग्लेन मॅक्सवेल (६०४ चेंडू), तसेच आंद्रे रसेल आणि फिन अॅलन (६०९ चेंडू) यांचा क्रम लागतो.
भारतीय संघाच्या विक्रमांच्या यादीत अभिषेक आता विराट कोहलीनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. विराटने २७ डावात १००० धावा पूर्ण केल्या होत्या, तर अभिषेकने फक्त एका डावाने अधिक – म्हणजे २८ व्या डावात हा पराक्रम साधला आहे. केवळ वयाच्या पंचविशीत अभिषेकने केलेल्या या धडाकेबाज खेळीमुळे भारतीय टी-२० संघाच्या भविष्यातील शक्तीचे दर्शन घडले आहे.



