जळगाव प्रतिनिधी । आशा दिनानिमित्त शहरातील कांताई सभागृहात गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ना. गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी गटविकास अधिकारी एस. डी. जाधव व शशिकांत सोनवणे यांच्यासह व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य नंदलाल पाटील, जनार्धन कोळी, तुषार महाजन, शारदा पाटील, विटनेर सरपंच चावदास कोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय चव्हाण , डॉ. शिवराय पाटील , फुपनी सरपंच डॉ. कमलाकर पाटील, आशा समूह संघटक सुनील पाटील, अजय जाधव, कांताई नेत्रालायचे डॉ. पल्लवी चौधरी आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी मंत्री पाटील, गटविकास अधिकारी जाधव व सोनवणे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
आशा समाजात आरोग्य विषयक जागृती निर्माण करण्याचे काम करीत असून रुग्ण, कर्मचारी, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयकाची प्रामाणिक भूमिका पार पाडत आहेत. आशा कर्मचार्यांना प्रतिमाहिना सहा हजार रुपये मानधन मिळावे यासाठी व पोलिस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले. तसेच जळगाव ग्रामीण मतदारसंघातील सुमारे ४०० आशा व गट प्रवर्तक यांना राज्यमंत्री पाटील यांच्यातर्फे भोजनाचे मोठे डबे भेट म्हणून देण्यात आले. तसेच १० फेब्रुवारीपासून ४०० आशा व गतप्रवर्तक यांचा विमा राज्यमंत्री पाटील यांच्या स्वखर्चाने काढला जाणार असल्याची घोषणा गुलाबराव पाटील यांनी केली. जळगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांनी प्रास्ताविकात केले.आशा जिल्हा समन्वयक प्रवीण जगताप यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शिवराय पाटील यांनी आभार मानले.