हरियाणात ‘आप’ने जाहीर केली उमेदवारांची यादी; काँग्रेसशी आघाडी तुटली

गुरूग्राम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आप यांच्यातील आघाडी तुटली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू होती. आम आदमी पक्षाने आता हरियाणामध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. आपने २० उमेदवारांची यादी देखील जारी केली आहे. आम आदमी पक्षाने निर्णय घेण्यासाठी आजपर्यंतची मुदत दिली होती. मात्र काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली.

चर्चेच्या तीन फेऱ्यांनंतर ‘आप’ला पाच जागा देण्यावर काँग्रेस सहमत असल्याचे दिसत होते. मात्र आप अधिक जागांच्या मागणीवर ठाम होती. हरियाणाा आपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील गुप्ता यांनी सकाळीच सांगितले होते की, जर आज ठोस निर्णय झाला नाही तर आम्ही आमच्या उमेदवारांची घोषणा करू. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर आहे, त्यामुळे जास्त वेळ थांबता येणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासोबत युती करण्याची कल्पना राहुल गांधी यांची होती. यासाठी पक्षाने केसी वेणुगोपाल, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुडा, प्रदेश प्रभारी दीपक बाबरिया आणि प्रदेशाध्यक्ष चौधरी उदयभान यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती ‘आप’सोबतच्या युतीला अंतिम स्वरूप देत आहे. रविवारी दीपक बाबरिया आणि आपचे नेते राघव चढ्ढा यांच्यातही बैठक झाली. ‘आप’ने काँग्रेसकडे 10 जागांची मागणी केली होती, मात्र पाच जागांवर निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आघाडी बनू शकली नाही.

Protected Content